नवी दिल्ली – आत्मघाती दहशतवादी होण्याच्या प्रयत्नात असलेली पुणे येथील २० वर्षीय महिलेला तीन वर्षात २ वेळा समजावण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) ने दाखल केलेल्या एफआयआर नुसार, जिहादी विचारधारेपासून संबंधित महिला मागे हटत नसल्याचे समोर आले आहे.
एनआयएच्या मते पुणे येथील येरवडा स्थित सादिया अनवर शेख हिस २०१५ आणि २०१८ रोजी समज देण्यात आली होती. समज देऊनही सप्टेंबरमध्ये इस्लामिक स्टेट विरुद्ध एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संबंधित महिला पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान या देशांशी २०१५ पासून संपर्कात आहे. तसेच इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत, अल कायदा, अंसार ग़ज़ावत-उल-हिंद अशा निरनिराळ्या आतंकवादी संस्थांशी संलग्न असल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी २०१८ ला एनआयएतर्फे चौकशी करण्यात आली होती. सादिया १५ वर्षांची असतांना तिच्या फेसबुक अकाउंटद्वारे एक उपदेशक संपर्कात असल्याचे आढळून आले. इस्लामिक उपदेशक डॉ. जाकिर नाइक याच्या संपर्कात असून सध्या तो मलेशियात लपला असल्याचे एनआयएने म्हटले आहे. दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात असलेली सादियाने २०१८ नंतर फेसबुकवर विविध नावाने अकाउंट तयार केले आहे.