नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी, एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. यासाठी अल्पकालीन उपाययोजना अंमलात आणून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांवर सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एनएचएआय प्रकल्प संचालकांना आता संबंधित राज्य पोलीस प्रमुखांनी किंवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने चिन्हीत केलेल्या आणि शिफारस केलेल्या अपघातप्रवण स्थळांच्या भागात दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत. अशा अपघातप्रवण प्रत्येक भागासाठी १० लाख रूपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. जर अशा धोक्याच्या भागासाठी १० लाखांपेक्षा जास्त आणि २५ लाख रूपयांपर्यंत खर्च अपेक्षित असेल तर अल्प-मुदतीच्या उपाययोजनेतून २५ लाखांचा निधी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येईल.
एनएचएआयने यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरित आहेत, ज्यात प्रकल्प संचालक, अपघातप्रवण स्थाने निदर्शनास आणले तर प्रति अपघातप्रवण स्थानासाठी २५ लाख रूपयांपर्यंत अल्पकालीन उपाययोजना करून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय द्वारा अधिसूचित अपघात प्रवण स्थानाच्या दुरूस्तीला मान्यता देऊ शकतात. तसेच एकाच प्रकल्पामध्ये जर अनेक अपघातप्रवण स्थाने आहेत, आणि त्या मार्गाची सुधारणा करणे गरजेचे असेल तर, सर्व कामांसाठी लागणा-या सामानाची खरेदी एकत्रित करून कामे करता येतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विशिष्ट मापदंडानुसार अपघातप्रवण क्षेत्र अधिसूचित करते. तथापि, राष्ट्रीय महामार्गांवर रस्ता सुरक्षा आणि वापरकर्त्यांना अधिक सुविधा मिळावी यासाठी एनएचएआयने मंत्रालयाद्वारे अधिसूचित केलेल्या अपघातप्रवण स्थानांव्यतिरिक्त अल्पकालीन उपाययोजना राबवून, अपघातप्रवण ठिकाणे दुरुस्त करण्यासाठी अशा पद्धतीने सक्रिय पुढाकार घेतला आहे.
अल्पकालीन उपायांमध्ये पादचारींच्या सुविधेसाठी पदपथ तयार करणे, झेब्रा क्रॉसिंग, वाहने येत आहेत, हा आधीच इशारा देणे, वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी ‘क्रॅश’ अडथळे आणि रेलिंग, जंक्शन सुधारणा, सौर दिवे/ब्लिंकर, रस्त्यावरील चिन्हे आणि एकदम मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू राहू नये, यासाठी आवश्यक उपायांची अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा सुधारणे ही गोष्ट, ‘एनएचएआय’च्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि अखंड प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी एनएचएआय वचनबद्ध आहे.