चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल हायवे अॅथॉरिटीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली चांदवड येथील महामार्गालगतचे गट नंबर ७१४ मधील श्री मेघपार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदीर हे जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अतिशय प्राचीन असे जागृत मंदीर पाडण्याबाबत नोटीस बजावली आहे.
संपूर्ण देशातून लाखो जैन भाविक वर्षभरात या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. देशातील लाखो जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हे प्राचीन मंदीर पाडण्याच्या नोटीशीमुळे सकल जैन समाजात प्रचंड असंतोष पसरला असून या अतिशय निंदनीय कृतीमुळे लाखो जैन भाविकांच्या श्रद्धास्थानाला धक्का पोहचला आहे. जर महामार्गाचे विस्तारीकरणच करायचे असेल तर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा जागा उपलब्ध आहे.
त्याबाजूने विस्तारीकरण करुन मंदीर वाचू शकते. म्हणजेच मंदिराला हात न लावता सुद्धा महामार्गाचे विस्तारीकरण होऊ शकते. परंतु या पर्यायाचा विचार न करता नॅशनल हायवे अॅथॉरिटीने हे पुरातन व जागृत मंदीर पाडण्याबाबत नोटीस बजावली आहे. थोडक्यात, समाजाचा काही एक दोष नसतांना नॅशनल हायवे अॅथॉरिटीने बेकायदेशीररित्या मंदीर पाडण्याबाबतची नोटीस बजावल्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या नोटीसमुळे जैन समाज आंदोलनाच्या पावित्र्यात असून नॅशनल हायवे अॅथॉरिटीने ही नोटीस मागे न घेतल्यास सकल जैन समाज आपले श्रद्धास्थान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.