अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात इंधनाच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दोन रुपयांनी जरी कमी झाले तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात येईल. पेट्रोलवर बंदी घालण्यात येईल, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्याची देशभर जोरदार चर्चा होत आहे.
येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी यांना कृषी विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी होते.
गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते ७० रुपये प्रति किलो दराने विकता येते. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल, असे गडकरी म्हणाले. केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
गडकरींनी स्पष्ट केले की, इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाची २० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजिकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना असून त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ बरेच काही करू शकते, अही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानद पदवी बद्दल विद्यापीठ व कार्यकारी समितीचे आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात गडकरी यांनी सांगितले की, कोणताही पदार्थ आणि व्यक्ती ही निरुपयोगी असत नाही. त्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान आपल्यापाशी असणे आवश्यक आहे. मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी करण्याचे उद्दिष्ट आपले असले पाहिजे. विदर्भाची पिकस्थिती ध्यानात घेऊन त्याविषयी संशोधन करणे आवश्यक आहे. आपण सर्व संशोधकांनी यादृष्टिने संशोधन करावे, जेणेकरुन शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. सकल घरेलू उत्पादनात योगदान कमी मात्र शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या अधिक अशी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीवर आधारीत उद्योगात गुंतवणूक व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढवायला हवे. त्यासाठी ग्रीन हायड्रोजन, बायो डीजल यासारख्या उत्पादनांकडे शेतकऱ्यांनी वळावे, आणि शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न होता उर्जादाता ही व्हावे, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले. विदर्भात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे हे माझ्या जीवनाचे मिशन आहे. त्यासाठी शेतीतून अधिकाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी मी स्वतः प्रयोग करीत असतो. विद्यापीठानेही याच क्षेत्रात योगदान द्यावे. शिकून तयार झालेल्या युवकांनी नोकरी देणारे व्हावे. कृषी क्षेत्राशी निगडीत नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा आणि कृषी आधारीत उद्योग निर्माण करा,असे आवाहन त्यांनी केले.
Next 5 years Petrol Will be ban claim by Union Minister Nitin Gadkari