विशेष प्रतिनिधी, मुंबई
अरबी समुद्रात आलेल्या वादळामुळे भारतातील अनेक राज्यांच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह गुजरात, रायलसीमा, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल, केरळ, लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर किमी राहणार आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार लक्षद्वीप परिसर आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीप येथे १५ तारखेच्या पहाटे तो अधिक तीव्र होऊन त्यानंतरच्या २४ तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
हे वादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या पाकिस्तान किनारपट्टीकडे दिशेने जाण्याची शक्यता आहे. ते १८ मे रोजी संध्याकाळी गुजरात किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे लक्षद्वीप येथे १३ ते १६ मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये १३ ते १६ मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ते १७ मे दरम्यान दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.