न्यूयॉर्क – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून न्यूयॉर्क, अमेरिका येथे इंडियन फेडरेशन ने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात डेट्रॉईट, मिशिगन येथील 60 हून अधिक मराठी बंधू-भगिनींनी सादर केलेल्या ढोल वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या समारंभात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीतांबरोबरच मुख्य आकर्षण होते ते ६०हुन अधिक ढोल वादकांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईट च्या ढोल पथकाद्वारा केल्या जाणाऱ्या ढोल वादनाचे . मूळ चा नाशिककर असणार्या प्रणव औंधकर याने सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी अथक प्रयत्नाने महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने ढोल पथकाची स्थापना केली.
विद्यमान अध्यक्ष मंजिरी जोशी, खजिनदार किरण इंगळे यांच्या प्रोत्साहनाने न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभाग निश्चित करण्यात आला. डेट्रॉईट न्यूयॉर्क हे तब्बल हजार किलोमीटरचे अंतर खास वाहनाने पार करून हे पथक टाईम स्क्वेअर येथे उपस्थित झाले.
चमूच्या सादरीकरणास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चार ते पाच हजारांहून अधिक भारतीयांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला . प्रणव औंधकर याच्या व्यतिरिक्त प्रशांत बडवाईक, विजय पाचोरे, अमित शहा, निळकंठन, अमित आवळे आदींच्या सामूहिक नेतृत्वाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.