इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भुवनेश्वर: ओडिशात कार्तिक पौर्णिमेला पारंपारिक ‘बोईता बंदना’ उत्सवा दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला. पाच ते बारा वयोगटातील या मुलांना वार्षिक विधीत सहभागी होताना जीव गमवावा लागला.
‘बोईता बंदना’ उत्सवात रंगीबेरंगी लहान बोटी तलाव, नद्या आणि इतर पाणवठ्यांमध्ये तरंगल्या जातात. बालासोरमधील बस्ता पोलिस हद्दीतील पानिशपाडा गावात सुमारे पाच वर्षांच्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दिलीप कुमार दास आणि मानस नंदा यांच्या मुलींनी त्यांच्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत तलावातून छोट्या होड्या गोळा करण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान त्या दोघींचा तलावात बुडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढले. बालासोरमधील अन्य एका घटनेत, खैरा पोलिस हद्दीतील सौंदिया गावात एका तीन वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. कटक जिल्ह्यात अशीच एक घटना घडली, जिथे सालेपूर ब्लॉकमधील करमुआन गावात तलावातून बोटी गोळा करण्याचा प्रयत्न करत असताना प्रदीपता भोई यांचा तीन वर्षांचा मुलगा बुडाला.
पोलिसांनी सांगितले, की मलकानगिरी जिल्ह्यातील चंपानगर येथे साबित्री हंतल या १२ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ती लहान बोटींवर ठेवलेली नाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना ती खोल पाण्यात पडली आणि बुडू लागली. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.