मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येते.
कमी जास्त पाऊस, कमी / जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचे वारे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या बाबींचा विचार करून राज्यात आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या ९ फळपिकांसाठी महसूल मंडल स्तरावर ही योजना राबविण्यात येते.
हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते. यात ३५ टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण ५ टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते. ३५ टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा ५० टक्के असतो. आंबिया बहार २०२३-२४ मधील राज्य शासनाची एकूण विमा हप्ता रु. ३९० कोटी होता , त्या पैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये ३४४ कोटी हे शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरा अनुदान विमा कंपन्यांना प्राप्त होईल व या आंबिया २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई रु. ८१४ कोटी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येईल.