लखनऊ (उत्तर प्रदेश) – कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पुन्हा एकदा विवाह समारंभ होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात असाच एक धुमधडाक्यात विवाह समारंभ पार पडला. परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासरी आल्यावर वधूने अचानकपणे नवऱ्याच्या कानशिलात लगावली. तेव्हा दोन्हीकडचे नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी हे दृश्य पाहून अवाक् झाले. नेमके काय घडले? कुणालाच काही कळेना!
वधूला एखाद्या भुताने झपाटले तर नाही ना? अशी शंका येऊन एका मांत्रिकाला देखील बोलविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात वेगळेच घडले. वधूचे एका दुसऱ्याच मुलावर प्रेम असल्याने तिला हा विवाह करायचाच नव्हता. त्यामुळे आपला विवाह जबरदस्तीने झाला. अशी भावना होऊन नववधूने तिचा संताप चक्क नवऱ्यावरच काढला. त्यानंतर नववधूने तिचा सर्व साजशृंगार अंगावरून काढून तडक माहेरची वाट धरली.
जौनपूरच्या खुथान भागातील लावण गावातील युवकाचे लग्न खेतासराय गावातील एका मुलीशी २० जून रोजी होते. मिरवणुकीद्वारे नवरदेव वऱ्हाडींसह वधूच्या घरी पोचला. त्यानंतर रविवारी धुमधडाक्यात विवाह समारंभ पार पडला. मात्र दुसर्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी वधू सासरी जाण्यास निघाली म्हणजे वराच्या घरी पोहोचली. या दरम्यान वधूने वरावर हात उगारत अनेक वेळा थापड मारली, त्यावेळी करवली म्हणून सोबत आलेली महिला ही वधूला माहेरी घेऊन जाण्याच्या तयारीत होती.
त्याचवेळी वधूच्या सासरच्या लोकांनी असा विचार मांडला की, बुवा नववधूला काही भुत बाधा तर झाली नाही ना ? त्यामुळे एका मांत्रिक व्यक्तीला देखील बोलावले गेले होते. परंतु नववधूने स्वतः कबूल केले की, तिचे दुसऱ्याच एका युवकाशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आणि आता तिला त्याच्याबरोबरच राहायचे आहे. त्यानंतर मग वधूच्या माहेरच्या लोकांना बोलावून हे प्रकरण पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी तासन्तास चाललेल्या चर्चेनंतरही वधू सहमत सासरी जाण्यास संमत नव्हती. त्यानंतर तिने वधूचा पोशाख उतरविला आणि साध्या पोशाखात ती आपल्या माहेरी परत गेली.