इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे राज्य असले, तरी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना काही गोष्टी मिळण्यास कमतरता जाणवते, इतकेच नव्हे तर समान काम असतानाही काही ठिकाणी महिलांना कमी पैसे किंवा पगार मिळतो, असे दिसून येते. अगदी भारतातील खेड्यापाड्यातही पुरुष मजुरांना जास्त मजुरी आणि स्त्री मजुरांना कमी मजुरी असते, इतकेच नव्हे तर बॉलीवुड म्हणजे चित्रपट सृष्टीतही अभिनेत्यांना जास्त मानधन तर अभिनेत्रींना त्यापेक्षा कमी मानधन मिळते, क्रिकेटच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. मात्र आता न्यूझीलंड मध्ये मात्र दोन्ही क्रिकेटला सारखेच मानधन मिळणार आहे.
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनाही आता पुरुष क्रिकेटपटूंइतकेच पैसे आंतरराष्ट्रीय आणि उच्चस्तरीय देशांतर्गत सामन्यांसाठी मिळणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की, व्यावसायिक महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान खेळासाठी समान वेतन मिळेल. यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे, ज्यामध्ये व्हाईट फर्न्स आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना ODI, T20I, फोर्ड ट्रॉफी आणि सुपर स्मॅश स्तरासह सर्व फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये पुरुषांप्रमाणेच मॅच फी मिळेल.
या करारामुळे न्यूझीलंडमधील महिला क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या करारांची संख्याही वाढते आणि नवोदित खेळाडूंसाठी उपलब्ध स्पर्धात्मक सामन्यांची संख्या वाढते. व्हाईट फर्न्सची कर्णधार सोफी डिव्हाईन म्हणाली की हा करार महिला क्रिकेटसाठी गेम चेंजर ठरेल. “आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना पुरुषांसोबत समान करारामध्ये मान्यता मिळणे हे खूप चांगले आहे,” डेव्हाईन म्हणाली.
एवढे मिळेल मानधन
– एका कसोटी सामन्यासाठी 10,250 डॉलर्स (अंदाजे रु. 8 लाख),
– एकदिवसीय सामन्यासाठी 4,000 डॉलर्स (सुमारे 3 लाख 15 हजार रुपये)
– T20I सामन्यासाठी 2,500 डॉलर्स (अंदाजे रु. 2 लाख)
– फोर्ड ट्रॉफी/हॅलिबर्टन जॉनस्टोन शील्डशी जुळण्यासाठी 800 डॉलर्स
– सुपर स्मॅश सामन्यांसाठी 575 डॉलर्स.
New Zealand Cricket Board Announcement for Women Players Fees