न्यूयॉर्क – गेल्या काही वर्षात ग्लोबल वार्मिंगमुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे जगभरातील हवामानामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. सहाजिकच कुठे तुफानी पाऊस आणि ढग फुटी सारखे प्रकार घडून महापूर येत आहेत. तर काही ठिकाणी जंगलांना वणवे लागणे, किंवा कोरडा दुष्काळ अशा घटना घडत आहेत. अमेरिकेत देखील गेल्या वर्षभरापासून असे प्रकार वारंवार घडत आहेत.
सध्या उष्णकटिबंधीय ‘इडा’ या वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने पूर्व अमेरिकेत प्रचंड गोंधळ उडाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: न्यूयॉर्क परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत येथे सुमारे ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि पूर यामुळे न्यू जर्सीमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे एकदंरीत परिस्थिती पाहता दोन्ही प्रांतांच्या राज्यपालांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये रस्ते आणि रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले असून भुयारी मार्गावर जणू धबधबे वाहत आहेत. अनेक भागात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी पाऊस आणि वादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी तातडीने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी तुफान पावसाला हवामान बदलाची घटना म्हटले. राष्ट्रीय हवामान सेवेने न्यूयॉर्क शहरात प्रथमच आपत्कालीन रेड अलर्ट जारी केला.
दुसरीकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी देखील आणीबाणीची स्थिती घोषित केली,असून या शहरात अनेक भाग पूर्णपणे अंधारात बुडाले आहेत. न्यू जर्सीच्या ग्लॉसेस्टर काउंटीलाही पाऊस आणि पुराच्या कहरात वादळाचा सामना करावा लागला. त्यामुळे परिसरातील शेकडो घरांचे नुकसान झाले.
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये सामान्य लोकांना घरे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही प्रांतांमध्ये गुरुवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपत्कालीन वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांना रस्त्यावर परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे खराब हवामानामुळे न्यू जर्सीमधील ट्रान्झिट रेल्वे सेवा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नेवार्क लिबर्टी विमानतळावर पुरामुळे सर्व प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. दुसरीकडे, न्यूयॉर्कमध्येही प्रशासनाने भुयारी सेवा बंद केली आहे. न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात सर्व शहर जलमय होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.