मुंबई – तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. त्यातही जर तुम्ही दुचाकीवर हेल्मेट आणि चारचाकीत सीटबेल्ट लावत नसाल तर हमखास तुम्ही सावध व्हा. कारण, राज्य सरकारने आता वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी दिवाळीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसलेल्या वाहनधारकांना थेट १ हजार रुपयांचा दंड करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. तसेच, विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांचा वाहतूक परवाना (लायसन) तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचीही तरतूद यात आहे. मद्यपी वाहनचालकांवर न्यायालयीन कारवाई आणि मोठा दंड केला जाणार आहे. पहिल्यांदा आढळल्यास ६ महिने तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
फॅन्सी नंबर प्लेट, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास वापरणाऱ्या वाहनचालकांना १ हजार रुपये दंड केला जाणार आहे. तसेच निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास २ हजार तर विनापरमिट वाहन चालवणाऱ्यांना २ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. वाहतूक नियमांचे सक्तीने पालन, अपघात कमी करणे आणि सुरळीत वाहतूक होणे यासाठी हे नियम कडक केले जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. दरम्यान, अद्याप या नियमांचे सरकारी आदेश आलेले नाहीत. पण, ते येत्या काही दिवसातच काढले जातील, असे सांगितले जात आहे.