मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही कोणतेही वाहन चालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वाहन चालवण्याचा एक नवा नियम आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. देशातील सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या विंडस्क्रीनवर फिटनेस प्रमाणपत्र आणि मोटार वाहन नोंदणी चिन्ह दाखवावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र सरकारने सांगितलेल्या फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गुरुवारी एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अवजड माल/प्रवासी वाहने, मध्यम माल/प्रवासी वाहने आणि हलक्या मोटार वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र आणि नोंदणी चिन्ह विंडस्क्रीनच्या डाव्या बाजूच्या वरील कोपऱ्यात लावावे लागणार आहे. तर, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, ई-कार्ट आणि क्वाड्रिक सायकलच्या विंडस्क्रीनच्या डाव्या बाजूच्या वरच्या काठावर योग्यरित्या बसवावे लागणार आहे. त्याशिवाय मोटरसायकलसारख्या दुचाकींवर व्यवस्थित दिसणाऱ्या भागात ते प्रदर्शित करावे लागेल. हे चिन्ह एरियल बोल्ड स्क्रिप्टमध्ये निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पिवळ्या रंगात दर्शवण्यात येणार आहे.
नवे नियम काय आहेत
– जुन्या वाहनांच्या विंडशील्डवर फिटनेस प्रमाणपत्र प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
– फिटनेस प्रमाणपत्र खालील प्रमाणे दर्शवणे आवश्यक आहे- DD/MM/YYYY
– नोंदणी क्रमांकाचा उल्लेख खाली असणे आवश्यक आहे.
– अवजड. मध्यम आणि हलक्या मालवाहतूक वाहनांसाठी हे प्रमाणपत्र डाव्या बाजूला विंडशील्डवर लावावे लागेल.
– ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, ई-कार्ट आणि क्वाड्रिसायकलसाठी हे प्रमाणपत्र विंडस्क्रीनच्या डाव्या बाजूला वरील काठावर प्रदर्शित करावे लागेल.
– एरियल बोल्ड स्क्रिप्ट टाईपमध्ये निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पिवळ्या रंगात दाखवले जाणार आहे.