मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एकूण ५७७ मेगावॅटचे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच साकारण्यात येणार आहेत. त्यात कौडगाव (ता.शिंदेला, जि.लातूर), साक्री (जि. धुळे), वाशीम, कचराळा (जि. चंद्रपूर) आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. तसेच राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर पार्क विकसित करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींच्या घरासाठी स्वस्तात वीज जोडणी देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा कालावधी ६ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
१ एप्रिल २०१८ पासून प्रलंबित असलेल्या २ लाख ४० हजार कृषिपंपापैकी आजपर्यंत 1 लाख कृषिपंपाना नवीन जोडण्या देण्यात आल्या असून सन २०२२-२३ या कालावधीत आणखी ६० हजार कृषिपंपांचे वीज जोडणीचे उद्दीष्ट साध्य करण्याचा संकल्पही आम्ही या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे,असेही डॉ राऊत यांनी म्हटले आहे. नवीन आर्थिक वर्षासाठी ऊर्जा विभागाला ९ हजार ९२६ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असून यामुळे उर्जा विभागाला फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी ५ प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी ११५३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाला राज्याला थकबाकीमुक्त करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी अधिक आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. विविध मार्गांनी ही अपेक्षा येत्या आर्थिक वर्षात पूर्ण होईल. नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याची तरतूद केल्याने विदर्भात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळणार असल्याचेही ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.