नागपूर – जगात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उपकरणे इत्यादी वस्तूंच्या निर्मितीत चीन, जापान, कोरिया या देशांचा दबदबा आहे. कोणत्याही क्षेत्रासाठी भारत हे सर्वात मोठे मार्केट समजले जाते. परवडणाऱ्या दरात वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांदरम्यान मोठी स्पर्धा पहायला मिळते. त्यातच भारताशी कसेही संबंध असले तरी आपल्या शेजारील चीनसाठी भारत हे सर्वात मोठे मार्केट आहे हे नाकारून चालणार नाही.
त्यामुळेच भारतात चिनी कंपन्यांचा दबदबा कायम आहे. भारतातील टॉप पाच स्मार्टफोन कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये ४ चिनी स्मार्टफोन कंपन्यांचे नाव समोर येते. तर सॅमसंग ही एकमेवक कंपनी या यादीतील वेगळ्या देशाची कंपनी आहे. एकूणच भारतातील ८० ते ९० टक्के स्मार्टफोन बाजारावर चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा ताबा आहे. तसेच भारतातील ५ जी स्मार्टफोनसाठी सुद्धा चिनी कंपन्या अग्रेसर आहेत. भारतात विक्री होणार्या स्मार्टफोनमध्ये चिनी स्मार्टफोनची सर्वात मोठी भागिदारी आहे.
इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या अहवालानुसार भारतात OnePlus Nord, iPhone 12 आणि Galaxy A22 हे सर्वात जास्त विक्री होणारे स्मार्टफोन आहेत. २०२१ च्या तिसर्या तिमाहीत हे स्मार्टफोन सर्वाधिक पसंतीला उतरले आहेत. भारत हे ५ जी स्मार्टफोनचे जगातील तिसरे सर्वात मोठे मार्केट आहे. या वर्षाच्या तिसर्या तिमाहीत येथे एकूण १० लाख स्मार्टफोनची वाहतूक झाली आहे. तर जानेवारीपासून ते सप्टेबंर २०२१ पर्यंत एकूण १७ लाख ५ जी स्मार्टफोनची वाहतूक झाली आहे.
सर्वाधिक विक्री होणारे ४ जी स्मार्टफोन
Xiaomi ब्रँडेड Redmi 9A, Redmi 9 Power, Redmi Note 10s या स्मार्टफोन्सला भारतात सर्वाधिक पसंती मिळाली. हे कमी आणि मध्यम किमतीतील स्मार्टफोन आहेत. तसेच Xiaomi चा उपब्रँड Poco चे दोन स्मार्टफोन Poco M3 आणि Poco C3 या स्मार्टफोन्सना भारतात तिसर्या तिमाहीत सर्वाधिक पसंती मिळाली. सॅमसंगच्या स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास Galaxy M आणि A या स्मार्टफोनना खूपच मागणी होती. भारतात Samsung Galaxy A22, Galaxy A12, Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3 या स्मार्टफोनना चांगली मागणी होती.
Vivo ब्रँडच्या V सीरिज आणि iQOO सीरिजच्या स्मार्टफोन्सना भारतात खूपच पसंती मिळाली. तसेच Vivo च्या X लाही चांगली मागणी राहिली आहे. भारतात Realme च्या सर्वात जास्त मागणी असलेल्या स्मार्टफोनमध्ये Realme C11 (2021), Realme 8 4G आणि Realme 8 5G चे नाव समोर येते. Oppo कंपनीच्या Oppo Reno 6 हा स्मार्टफोन भारतात जास्त पसंतीस पडला आहे.