नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे नवनियुक्त आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांनी स्विकारली आहेत. आज दुपारी त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. मावळते अध्यक्ष दीपक पाण्डेय यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. नाईकनवरे हे वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. त्यांना पोलिस प्रशासनातील कामाचा मोठा अनुभव आहे. राज्याच्या विविध शहरांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. काही ठिकाणी त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले. त्यात नाशिक पोलिस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकचे तत्कालिन आयुक्त दीपक पाण्डेय हे राज्यभरात गाजले. खासकरुन त्यांचा लेटरबॉम्ब विशेष चर्चेत राहिला. महसूल विभागाचे अधिकार काढून ते पोलिस आयुक्तांना द्या, अशी मागणीच त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. राज्य मंत्रिमंडळातही त्याची चर्चा झाली. उपमुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्र्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडते की काय, असा प्रश्नही उपस्थित झाला. मात्र, पाण्डेय यांनी त्या पत्रावर सावरासावर केली.
पाण्डेय यांनी हेल्मेट सक्तीचा केलेला नियमही नाशिककरांना जाचक ठरला. दुचाकीवरील दोघांना हेल्मेट सक्ती करण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच विनाहेल्मेट पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर गुन्हा दाखल करण्याचेही त्यांनी फर्मान काढले. या सर्व बाबींमुळे नाशिकचे पोलिस आयुक्त वादग्रस्त बनले होते. त्यातच पाण्डेय यांनी स्वतःच गृह विभागाकडे बदलीचा अर्ज केला. अखेर त्यांची मुंबईत बदली झाली आहे.