मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रिझर्व्ह बँकने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांसाठी एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कर्जवसुलीसाठी रिकव्हरी एजंटबाबतचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. दादागिरी, शिविगाळ करणाऱ्या एजंट्सला त्यामुळे चाप बसू शकणार आहे.
आरबीआयने परिपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या नियामक कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना हे सुनिश्चित करावे लागेल की रिकव्हरी एजंट कर्जदारांना त्रास देणार नाही. कोणत्याही कर्जदाराशी गैरवर्तन, हाणामारी करणार नाही. बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना धमकावणे, त्रास देणे या घटना थांबवाव्यात, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, कर्जदारांच्या नातेवाईकांना, ओळखीच्या व्यक्तींना त्रास देण्याच्या घटनांना आळा घालावा असंही स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. हे परिपत्रक सर्व व्यावसायिक बँका, सर्व बिगर बँक वित्तीय कंपन्या, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, वित्तीय संस्था आणि सर्व नागरी सहकारी बँकांना लागू असणार आहे. याबरोबरच, ग्राहकाला आक्षेपार्ह मेसेज पाठवणे, सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकारही थांबवण्याच्या सूचना बँकेने एजंट्स द्याव्यात असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही काळात रिकव्हरी एजंट्सच्या मनमानी कारभाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दखल घेऊन हे परिपत्रक जारी केले आहे. नव्या आदेशानुसार सकाळी ८ पूर्वी आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर ग्राहकांना रिकव्हरीसाठी फोन केले जाऊ नये असेही सांगण्यात आले असून, बँकांनी रिकव्हरी एजंटना नियमांचं काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.
ग्राहकांच्या तक्रारीवर गांभीर्याने विचार
बँक किंवा वित्तीय संस्था किंवा त्यांचे एजंटकडून कोणत्याही प्रकारच्या धमकी किंवा छळाचा अवलंब करण्यात येऊ नये असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. जर ग्राहकांकडून एजंट्सबाबत तशी तक्रार गेली तर त्यावर गांभीर्याने विचार करु असंही आरबीआयने बजावलं आहे.