नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी मुंबई परिसरात पोलिसांनी अक्षरशः सिनेस्टाईल कारवाई केली आहे. अॅम्ब्युलन्स, कार, टेम्पो अशा विविध वाहनांमधून येत तसेच कुणी डॉक्टर, कुणी नर्स, कुणी पासपोर्ट अधिकारी तर कुणी सफाई कर्मचारी बनून पोलिसांनी अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उद्धवस्त केले आहे. एकाचवेळी तब्बल ६ ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी नवी मुंबईतील सहा ठिकाणी टाकलेल्या छापा टाकून १४ आफ्रिकन नागरिकांकडून ५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ७५ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.
यातील १४ जणांकडे ड्रग्ज सापडले आहेत. या मध्ये ८९८ ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ट्रायमॅाल हायड्रोक्लोराईडच्या ३६ हजार ६४० ट्रप्स असे ५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ९ जणांवर पासपोर्ट अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३१ जणांना लिव्ह इंडिया नोटीस देवून भारतातून हद्दपार करण्यात येणार आहे. पोलिसांनी या कारवाईत ड्रग्ज विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल आणि वाहनंही ताब्यात घेतली आहेत.
तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी अफ्रिकन नागरिक कार्यरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मोहिमच पोलिसांनी हाती घेतली. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून ६०० जण या मोहिमेत होते. त्यामुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले. एज्यूकेशन हब आणि आयटी हब म्हणून ओळकल्या जाणा-या नवी मुंबईत अनेक मोठ्या शाळा, कॅालेज, उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत. त्यामुळे तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी अफ्रिकन नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करु लागले होते. पण, पोलिसांनी आता त्यांच्यावर करडी नजर ठेवल्यामुळे त्यांना आता वाचक बसणार आहे.
Police raid six places; 5 crore worth of narcotics seized from 14 African nationals,
New Mumbai Police Raid Narcotics Racket Burst