नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजमधील रँगिंगचे प्रकार रोखण्यासाठी कडक कायदे करण्यात आले असले तरीदेखील रॅगिंग होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील एका प्रसिद्ध डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार घडला आहे. रँगिंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईमध्ये कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये हा रॅगिंगचा प्रकार घडला आहे. चार सिनियर विद्यार्थ्यांवर ज्युनिअरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजनेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर कॉलेज प्रशासनाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. या चार विद्यार्थ्यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला दारू पिण्यासाठी भाग पाडले आणि त्याला पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला. ही घटना जुलैमध्ये घडली होती. पीडित मुलाने आता आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला हा पीडित विद्यार्थी कामोठे येथे आपल्या ३ मित्रांसह राहत होता.
त्याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटवर तिसऱ्या वर्षात शिकत असेलेले विद्यार्थीदेखील राहत होते. हे चार सिनियर विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांना पीडित विद्यार्थ्याला दारू पिण्यास भाग पाडले. यावेळी पीडित तरुणाला लघवीला आली असता रॅगिंग करणाऱ्यांनी त्याला लघवी करण्यापासून रोखले. त्याला अधिक पाणी पिऊन लघवी रोखून धरण्यास सांगितले. त्यानंतर रॅगिंग करणाऱ्यांनी पिडित मुलाला पँटमध्येच लघवी करण्याचा आग्रह धरला. कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने तक्रार केली. या नंतर कामोठे पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
New Mumbai Dental College Ragging Crime Police FIR