नवी दिल्ली – एकीकडे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्याने समाविष्ट झालेल्या भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा भाजपला किती फायदा झाला ? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असून भाजप कडून देखील या यात्रेबद्दल आढावा घेतला जात आहे.
नवीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकत्याच विविध प्रांतात काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी भाजपला किती फायदा होऊ शकतो, याचा आढावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत, यासाठी ही चाचपणी खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे भाजपने अलीकडेच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलून निवडणूक तयारीला नवे रूप दिले आहे. इतकेच नव्हे तर केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीपासून लखनौपर्यंत अनेक बैठका घेऊन उत्तर प्रदेशचा व्यापक आढावा घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नुकतेच नव्याने समाविष्ट झालेले, तसेच बढती मिळालेले भाजपचे ३९ मंत्री यांनी गेल्या महिन्यात दि. १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. काही ठिकाणी ती दोन आठवडे चालली. या दरम्यान या मंत्री गणांनी २१२ लोकसभा मतदारसंघांना भेट दिल्या, आणि १९ राज्यातील जनतेचे आशीर्वाद घेत संवाद साधला. तसेच या यात्रेमध्ये सर्व मंत्री यांनी काही दिवस स्वतंत्रपणे प्रवास करत सरकारचा विचार आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला.
यात्रा काळात सरकारच्या या उपक्रमाविषयी विरोध देखील झाला, कारण सध्या कोरोनाचा धोका कायम असून याचा संसर्ग वाढू शकतो, अशी टीका विरोधकांनी सातत्याने केली होती. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात या यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने वादंग निर्माण झाले होते त्यानंतर राणे यांना अटक झाली होती, त्यामुळे राणे यांच्या बरोबरच भाजपची देखील प्रतिमा मलिन झाली, असे म्हटले जाते. तर दुसरीकडे आसाम मध्ये देखील या यात्रेमुळे वाद निर्माण करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे चारमध्ये भाजपची सरकारे आहेत, तर पंजाब काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभीच या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे भाजपचे नेतृत्व विविध पातळ्यांवर तयारी करत आहे, पण त्याचा प्रयत्न गाव पातळीवर जाऊन पक्ष आणि सरकारबाबत लोकांचे मन जाणून घेण्याचा आहे. त्याचबरोबर सरकारने केलेल्या जनहिताच्या गोष्टी गरीब लोकांपर्यंत पोहचल्या का नाहीत ? त्या कशा पोहचवाव्या लागतात. याची या मंत्र्यांना व्हावी, म्हणून भाजप नेतृत्वांने यात्रा तथा दौऱ्यांचे नियोजन केले होते.
आता सदर यात्रा संपल्यानंतर या संदर्भात व्यापक अभिप्राय घेतला जात आहे. तसेच जिल्हा आणि राज्य संघटनांकडूनही माहिती घेतली जात आहे. कामगारांचा सहभाग, सरकार आणि पक्षाबद्दल लोकांची प्रतिक्रिया, केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया यांचा समावेश आहे. म्हणूनच जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या मानल्या जात आहे. तसेच सोशल मीडियावरील त्यांच्या चर्चेचाही अभ्यास केला जात आहे.