नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात एक्यूट रेस्पइरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) म्हणजेच फुफ्फुस पांढरे पडल्याने आणि कडकपणा आल्यामुळे माणसांचे मृत्यू झाले आहेत. आता यावर डॉक्टरांनी नव्या औषधाचे परीक्षण केले आहे. लखनऊमधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या रेस्पाइटरी मेडिसिन विभागाद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाला देशातील २५ प्रसिद्ध पल्मोनॉलॉजिस्टांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
एविप्टाविल नावाच्या औषधाचे यशस्वी परीक्षण केल्यानंतर हे औषध सामान्य रुग्णांना वापरण्यास परवानगी मिळावी यासाठी भारतीय औषधे महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) अहवाल पाठविण्यात आला आहे. कोरोनासह दुसऱ्या आजारांमुळे होणाऱ्या एआरडीएसचा संसर्ग होण्यापासून हे औषध सुरक्षित ठेवणार आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विषाणू आणि जिवाणू या दोन्हींमुळे होणाऱ्या निमोनियाचा प्रादुर्भाव कमी करण्यास हे औषथ मदत करेल. रुग्णांना फुफ्फुसामधील फायब्रोसिसपासून वाचवता येणार आहे. संशोधनाचे निष्कर्ष चांगले आले आहेत. यामधील अनेक रुग्णांना एआरडीएसच्या धोक्यापासून वाचविण्यात आले आहे. तसेच अनेक रुग्णांना एआरडीएस झाल्यानंतर त्यांना वाचविण्यात आले आहे. कोमॉर्विड रुग्णांंमध्ये औषधाचा परिणाम वेगवेगळा दिसून आला आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे एआरडीएसची प्रकरणे अधिक नोंदविण्यात आली आहेत. सामान्य परिस्थितीत देशातील दोन लाख नागरिकांपैकी तीन नागरिकांनाच एआरडीएस होतो. कोरोनामध्ये ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू झालेले रुग्ण एआरडीएसने बाधित होते.
प्रा. सूर्यकांत (संशोधनाचे टिम लिडर आणि रेस्पाइरेटरी मेडिसिन विभाग अध्यक्ष) म्हणाले की, एआरडीएस झाल्यानंतर रुग्णांना सामान्य परिस्थितीत आणणे खूपच कठीण काम होते. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये बहुतांश मृत्यू एआरडीएसमुळे झाले आहेत. आतापर्यंत कोणतेच परिणामकारक औषध नव्हते. त्यामुळे जगभरात वेगवेगळ्या औषधांवर संशोधन सुरू आहे. त्याची कडी म्हणून एविप्टाविल औषधाकडे पाहिले जाईल. या औषधाचे यशस्वी परीक्षण झाले आहे. त्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे.