मुंबई – आजच्या काळात अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे गॅस सिलिंडर नसेल तर घरात जेवण बनणार नाही. सहाजिकच आपल्याला उपाशी राहण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचे कनेक्शन आवश्यक असते. गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, मात्र आता एलपीजी कंपनीने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सण-उत्सवांच्या तोंडावर नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बुधवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये मोठी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही काही जणांना नवीन कनेक्शन घ्यायचे असेल तर त्याच्यावर पर्याय नसतो त्यामुळे किमतीत वाढ झाली तरी कनेक्शन घेणे आवश्यक ठरते.
नवीन एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. मिस्ड कॉलद्वारे गॅस कनेक्शन सहज मिळू शकते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपण याचा फायदा कसा घेऊ शकता ते समजून घेऊ या
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आता जर कोणी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल केला तर कंपनी त्याच्याशी संपर्क करेल. यानंतर आपल्याला अॅड्रेस प्रूफ आणि आधारद्वारे गॅस कनेक्शन मिळेल. तसेच या नंबरद्वारे गॅस रिफिल देखील केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून कॉल करावा लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील कोणाकडे गॅस कनेक्शन असल्यास. त्यामुळे तुम्ही त्याच पत्त्यावर कनेक्शनही घेऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला एजन्सीमध्ये जाऊन जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे दाखवून तुमच्या पत्त्याची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर त्याच पत्त्यावर तुम्हाला गॅस कनेक्शनही मिळेल.