विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता चाचण्यांनाही वेग येणार आहे. अमेरिकेच्या रॅपिड टेस्टिंग किट मोठ्या प्रमाणात भारतात पोहोचल्यावर कोविड चाचण्या वेगाने होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या दहा लाख रॅपिड टेस्टिंग किट भारतात पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी साडेसहा लाख किट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीएमआरकडून इतर संस्थांना गरजेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या कोविड किट अॅबट कंपनीच्या असून, पंधरा मिनिटांत कोविड चाचणीचे परीक्षण होणार आहे. काही मिनिटांतच कोविड आहे की नाही याबाबत कळू शकणार आहे. अमेरिकेतील व्हाइट हाउस आणि वरिष्ठ राजयकीय नेत्यांसाठीसुद्धा या किटचा उपयोग करण्यात आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा तुटवडा याशिवाय कोविड टेस्ट किट उपलब्ध करून देण्याची मागणी भारताने अमेरिकेकडे केली होती.
भारतात कोविड चाचण्यांसाठी मोठा दबाव आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत चाचण्यांंसाठी प्रयोगशाळांची क्षमता पुरेशी नसल्याचे सिद्ध झाले आहे. याच कारणामुळे चाचण्यांसाठी सरकारला नव्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्या लागल्या. सध्या दहा लाख किट अमेरिकेतून आल्या आहेत.
भारत-अमेरिका तज्ज्ञ संपर्कात
येत्या काही दिवसात चाचण्यांसाठीचा दबाव कमी व्हावा, तसेच कमीत कमी वैद्यकीय संस्थांकडे या प्रकारच्या किट उपलब्ध व्हाव्यात, असे प्रयत्न आहेत. भारतात पाठविण्यात येणारी उपकरणे आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक वैद्यकीय प्रोटोकॉलवरून भारत आणि अमेरिकेचे तज्ज्ञ सलग संपर्कात आहेत. अमेरिकेने एक लाख २५ हजार रेमडेसिव्हिरच्या कुप्या भारतात पाठविल्या आहेत. त्याशिवाय १५०० ऑक्सिजन सिलिंडर आणि ५५० मोबाईल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा पाठविले आहेत. एक मोठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेशन यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे २० पेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे.