विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रादुर्भावातून बरे झाल्यानंतर रुग्णांना काळी बुरशी तसेच इतर त्रासांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून मुक्त होत नाही तोच, आता त्यात आणखी एका आजाराची भर पडली आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सायटोमेगालो विषाणूचे (सीएमव्ही) रुग्ण आढळल्याचा खुलासा केला आहे. देशातील पहिले पाच रुग्ण याच रुग्णालयात दाखल झालेले आहेत. कोरोनाचा उपचार घेतल्यानंतर रुग्णांना पोटात दुखणे आणि शौचातून रक्त जाण्याच्या त्रासामुळे पुन्हा दाखल करावे लागले आहे. पैकी एका रुग्णाचा मृत्यूही झालेला आहे.
कोरोना संसर्गामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांच्यात काळी बुरशीचे अनेक प्रकरणे पाहण्यात आली आहेत. आता प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांना सीएमव्हीचा संसर्ग झाल्याचेही आढळले आहे. सीएमव्हीचा संसर्ग का होतोय त्याची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, असे डॉक्टर सांगतात.
रुग्णालयातील डॉ. अनिल अरोरा सांगतात, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बाधित रुग्णांमध्ये सीएमव्हीचे रुग्ण अचानक वाढू लागले आहेत. गेल्या ४५ दिवसांत हे रुग्ण आढळले आहेत.