नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ अन्वये सर्वात मोठ्या रकमेचा भारतातील प्रथम व ऐतिहासिक न्याय निर्णय दिला आहे. विम्याचा दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला आयोगाने मोठा दणका दिला आहे. कंपनीने तब्बल २२ कोटी ५९ लाख ३९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या निर्णयाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसला २ सप्टेंबर २०१९ रोजी आग लागली होती. या कोल्ड स्टोरेजच्या मालकांनी नुकसान भरपाईपोटी २५ कोटी मिळावेत यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे दावा दाखल केला होता. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे कोल्ड स्टोरेजला आग लागल्याचा ठपका ठेवत विमा कंपनीने हा दावा नाकारला. त्यानंतर कोल्ड स्टोरेजच्या मालकाने नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.
सदर प्रकरणांचे कामकाज आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवाल, सदस्य भारती केतकर, मोहन बोडस यांच्या समक्ष चालले. दोन्ही पक्षाचे युक्तीवादाअंती आगीच्या नुकसानी पोटी विमा कंपनीने २२ कोटी ५९ लाख ३९ हजार ७४५ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यू इंडिया इन्शुरस कंपनीला आयोगाने दिला. एवढेच नव्हे तर मानसिक, शारीरिक त्रास तसेच तक्रार अर्जाचा खर्च ३ लाख रुपये वेगळे द्यावे असेही निकालपत्रात म्हटले आहे. असे नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. इतक्या मोठ्या रकमेचा हा देशातील प्रथम आणि ऐतिहासिक जिल्हा आयोगाचा निकाल आहे.
New India Insurance Company Fine 22 Crore Rupees
Claim Rejection Consumer Forum