नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापीठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी 05 एप्रिल, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे-म्हसरुळ, नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. 257 मधील क्षेत्र 14 हेक्टर 31 आर जागा 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन ज्ञापनाद्वारे हस्तांतरण करण्यास मंजूरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय विद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चलना देण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
New Government College Mhasrul Land Transfer Order