नवी दिल्ली – देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असतानाच आता अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचा शिरकाव झाला असून ११ राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण संख्या वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. देशातील ११ राज्यांमध्ये डेंग्यूचा हा एक नवीन प्रकार ओळखला गेला असून आरोग्य तज्ज्ञांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. डेंग्यू अजूनही नियंत्रणात असला तरी, त्याचा नवीन प्रकार म्हणजे डेंग्यू DENV 2 ची अनेक प्रकरणे देशभरातून नोंदवली जात आहेत. डेंग्यूच्या अनेक प्रकारांपैकी DENV-2 हा सर्वात धोकादायक प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, हा डेंग्यू प्रकार अतिशय धोकादायक आहे. याच प्रकारामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद, आग्रा, मथुरा आणि अलीगढ जिल्ह्यात रुग्णांचा मृत्यू होत आहेत. आग्रा येथे सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर मैनपुरी आणि फिरोजाबादमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच फिरोजाबादमध्ये दीड महिन्यांहून अधिक काळ तापाचा उद्रेक झाला आहे.
सोमवारपर्यंत मृतांचा आकडा २०२पर्यंत झाला होता. आग्रा शहरात एसएन हॉस्पिटलमध्ये दाखल १३ रुग्णांची नोंद झाली आहे. मैनपुरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अलीगढ, हातरस, मथुरा आणि इटा येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
दाक्षिणेत तामिळनाडूतील आरोग्य अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या स्थानिक नागरिकांना डेंग्यूपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच घरोघरी जाऊन जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत येथे डेंग्यूचे २०० रुग्ण आढळले. चेन्नईमध्ये दरवर्षी जुलैपासून डेंग्यू साथ सुरू होते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती लक्षणीय वाढते. अशीच परिस्थिती दिसत आहे.
कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणावर फॉगिंग तथा धूर आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. येथे पावसाळा सुरू झाल्यापासून फॉगिंग करण्यात येत आहे. डेंग्यूची वाढती प्रकरणे पाहता, टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात फॉगिंग सुरू आहे. तसेच नागरिकांना चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरबाबतही सतर्क करण्यात आले आहे.