नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. बऱ्याच भागांमध्ये सर्वसामान्यांना रात्रीच्या वेळी एकटे जाणे खूपच धोकादायक असते. त्यात आता पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका मुलीला २२ ठिकाणी चावा घेतल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काक्षी तासांपूर्वीच कुत्र्याला नसबंदी केंद्रातून आणले गेले होते.
ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क भागात शाळेत जात असलेल्या नऊ वर्षांच्या मुलीवर नसबंदी केंद्रातून आलेल्या पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मुलीच्या पायाला जबर दुखापत झाली. मुलीच्या पायावर २२ ठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा आहेत. जखमी मुलीला शास्त्री पार्क येथील प्रवेशचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. राजधानी दिल्लीत भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी वाढली आहे की, दररोज हजारो लोक त्यांच्या चाव्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये रांगा दिसत आहेत.
मध्य दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया ते एकट्या सफदरजंग हॉस्पिटलपर्यंत दररोज ४००-५०० रुग्ण कुत्रा चावल्याने रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी येत असल्याची माहिती आहे. मार्चपासून सातत्याने कुत्रे चावल्याच्या घटना घडत आहेत. १५ सप्टेंबरला वसंत कुंज परिसरात एका महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यादरम्यान महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यापूर्वी १२ जूनला गीता कॉलनीत पाच वर्षाच्या चिमुरड्याला शेजारच्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. ३ मे रोजी रंगपुरी परिसरात एका सात वर्षांच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. तर त्यापूर्वी १२ मार्च व १२ एप्रिललाही अशाचप्रकारच्या घटनांची नोंद आहे. यात दोन लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला होता.
आजीसोबत होती चिमुकली
गुरुवारी सकाळी मी शिवानीला शाळेत सोडण्यासाठी जात होते. आम्ही उस्मानपूर डीडीए फ्लॅटमध्ये असलेल्या नसबंदी केंद्राबाहेर पोहोचलो असता, मुलीवर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. नसबंदी केंद्राचा दरवाजा उघडा असताना कुत्रा बाहेर आला होता. त्यानंतर तेथून जाणाऱ्या अख्तर मिर्झा या अपंग शिक्षकाने आपल्या स्कूटरने कुत्र्याला धडक दिली, त्यानंतर कुत्र्याने मुलीला सोडले. मुलीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण कुत्र्याने तिला सोडले नाही, अशी आपबिती आजीने सांगितली.
New Delhi Pitbull Dog Attack on Girl Child Serious Injured