इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही काळ शांत राहिल्यानंतर कोरोनाने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये हाहाकार माजला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणू XE च्या नवीन प्रकाराने दार ठोठावले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की हे नवीन प्रकार ओमिक्रॉनपेक्षा १० टक्के जास्त संसर्गजन्य आहे.
चीनसह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये वाढती प्रकरणे चिंतेचे कारण बनत आहेत. मात्र, भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मास्क न घालण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळताना लोकं दिसत नाहीत.
एका अहवालानुसार, ब्रिटिश हेल्थ सिक्युरिटी एजन्सी म्हणते की सध्या ३ हायब्रिड कोविड प्रकार आहेत. यामध्ये डेल्टा आणि BA.1 च्या विलीनीकरणातून XD आणि XF ही दोन रूपे निर्माण झाली आहेत. तिसरा प्रकार XE आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन XE व्हेरियंटला ओमिक्रॉन व्हेरियंटशी जोडण्याचा विचार करत आहे.
XE स्ट्रेन पहिल्यांदा यूकेमध्ये १९ जानेवारीला आढळला होता. तेव्हापासून त्याच्या ५००हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. ब्रिटीश एजन्सीचे म्हणणे आहे की सध्या नवीन प्रकाराबद्दल फारसे काही सांगता येणार नाही. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. ही लस यावर काम करेल की नाही हे देखील माहित नाही.
भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. पहिल्या आणि तिसर्या लाटा मात्र तितक्या भयावह नव्हत्या. मात्र दुसऱ्या लाटेत जीवित व वित्तहानी झाली. डेल्टा प्रकारामुळे देशाच्या अनेक भागात विनाश दिसून आला. सध्या येथे कोरोनाचा कोणताही प्रभाव नाही.
डिस्ट्रीक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी म्हणजेच DDMA ने शनिवारी सांगितले की ते यापुढे आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत दिल्लीतील कोविड-19 च्या प्रतिबंधाबाबत कोणताही औपचारिक आदेश जारी करणार नाहीत. परिस्थितीतील एकूण सुधारणा लक्षात घेता कोविडच्या प्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५च्या तरतुदींचा वापर करण्याची आवश्यकता नाही.