इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इस्रायलमध्ये नवीन कोरोना प्रकाराची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोना चाचणीतून नवीन प्रकाराची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की, बेन गुरियन विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून सध्याच्या स्ट्रेनमध्ये ओमिक्रॉन प्रकारातील ba.1 आणि ba.2 या दोन व्हेरिएंट समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे.
इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की कोरोनाचे हे प्रकार अतिशय नवीन आहेत. आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आले नव्हते. तसेच, ते म्हणाले की, BA.1 आणि BA.2 ची संयुक्तपणे लागण झालेल्या प्रवाशांना सौम्य ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखण्याचा त्रास होत आहे. याशिवाय त्यांच्यामध्ये अजून कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. यामुळे त्यांना कोणत्याही विशेष वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासलेली नाही. दरम्यान, इस्रायलचे साथीच्या रोग विभागाचे प्रमुख सलमान झारका यांनी या संसर्गाच्या नवीन प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असे सांगितले आहे.
चीनमध्ये, कोरोनाच्या BA.2 प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. संसर्गाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत येथे कोरोना विषाणूचे पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सब-व्हेरियंट ‘स्टेल्थ’चा सर्वाधिक लोकांना त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. जगात कोविडची चौथी लाट पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे.