विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई
कोरोना विषाणूच्या म्युटेशनबाबत वेगवेगळ्या संशोधनात वेगवेगळे आश्चर्यचकित करणारे खुलासे होत आहेत. संशोधकांनी केलेल्या संशोधनात एकाच राज्यात विषाणूने तब्बल ४७ वेळा आपले रूप बदलल्याचे आढळले आहे. तर इतर राज्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. विषाणूमध्ये म्युटेशन वेगाने होत असल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तिसरी लाट अधिक घातक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात केलेल्या अभ्यासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. तीन महिन्यांदरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांतील लोकांमध्ये नवे व्हेरिएंट दिसून आले आहेत. प्लाझ्मा, रेमडेसिव्हिर आणि स्टेरॉइडयुक्त औषधांचा भरपूर वापर केल्यामुळे म्युटेशनला प्रोत्साहन मिळाल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. त्यामुळे दुसर्या राज्यांमध्येही सिक्वेन्सिंग वाढविण्याची गरज आहे.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नवी दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसिस कंट्रोल (एनसीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात जिल्हावार एक संशोधन करण्यात आले. गेल्या वर्षभरात देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाल्यामुळे संशोधनासाठी राज्याची निवड करण्यात आली.
एनआयव्हीच्या डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, महाराष्ट्रात गेल्या फेब्रुवारीपासून विषाणूचे एस प्रोटिनमध्ये सर्वाधिक म्युटेशन आढळून आले. प्रत्येक म्युटेशनची माहिती घेतली जात आहे.
यापैकी अनेक म्युटेशनबाबत आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होती. विषाणूमध्ये सलग होणारे म्युटेशन आणि संसर्ग वाढण्याने गंभीर परिस्थितीचा पूर्वानुमान लावला जाऊ शकतो.
एनसीडीसीचे एक वरिष्ठ अधिकारी सांगतात, बी.१.६१७ व्हेरिएंट आतापर्यंत ५४ देशात आढळला आहे. त्याच्याच एका म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले आहे. गंभीर म्युटेशनचा शोध घेण्यासाठी दुसर्या लाटेदरम्यान स्थानिक पातळीवर फैलावणार्या म्युटेशनबाबत जिनोम सिक्वेन्सिंगची गरज आहे.
संशोधनात काय आढळले
यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. जानेवारीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली होती. विषाणूचे कोणकोणते व्हेरिएंट फैलावत आहेत याबाबत माहिती होण्यासाठी नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ७३३ नमुन्यांना एकत्र करून जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. संशोधकांना एकानंतर एक सर्व नमुन्यांमध्ये ४७ वेळा विषाणूचे म्युटेशन आढळले. देशात असे चित्र कधीच पाहायला मिळाले नाही. इटली, फ्रांस, यूके आणि अमेरिकेमधील परिस्थिती पाहता त्याबाबतची शंका आलेली होती. ७३३ पैकी ५९८ नमुन्यांच्या सिक्वेन्सिंगमध्ये संशोधकांना यश मिळाल्यानंतर त्यामध्ये असे आढळले की, डेल्टा व्हेरिएंटशिवाय अनेक व्हेरिएंटच् महाराष्ट्राच्या लोकांमध्ये प्रादुर्भाव होत आहे. ग्रामीण भागातही याचा प्रभाव पाहायला मिळाला.
तपासणीत अनेक व्हेरिएंट आले समोर
संशोधनादरम्यान २७३ नमुन्यांमध्ये बी.१.६१७, ७३ मध्ये बी.१.३६.२९,६७ मध्ये बी.१.१.३०६, ३१ मध्ये बी.१.१.७, २४ मध्ये बी.१.१.२१६, १७ मध्ये बी.१.५९६ आणि १५ नमुन्यात बी.१.१ व्हेरिएंट आढळले. त्याशिवाय १७ नमुन्यांमध्ये बी.१ आणि बी.१.३६ व्हेरिएंट १२ नमुन्यांमध्ये आढळले.
आधी पूर्व नंतर पश्चिम भागात प्रभाव
राज्याच्या पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये कोरोनाचे अनेक व्हेरिएंट फिरत आहेत. त्यापूर्वी राज्यात बी.१.६१७ व्हेरिएंट सर्वाधिक आढळला होता. पुणे, ठाणे, औरंगाबादसह पश्चिम भागात डेल्टा व्हेरिएंटचे वेगवेगळे म्युटेशन आढळले आहेत. बहुतांश म्युटेशन स्पाइक आणि आरबीडीच्या आतील संरचनेत झाले आहेत. परंतु यावर्षी फेब्रुवारीनंतर हे म्युटेशन स्पाइक प्रोटिन आणि आरबीडी संरचनेच्या बाहेर आढळले आहेत. तेच गंभीरतेचा इशारा देत आहेत.