नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोना विषाणू नव्या रूपात येऊन नागरिकांना बाधित करत आहे. सर्दी-पडसे, डोकेदुखी, अंगदुखी याशिवाय रुग्णांमध्ये इतर काही नवे लक्षणेही दिसून आली आहेत. अतिसार आणि रात्री घाम येणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे असू शकतात, हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. परंतु हे खरे आहे. बदलत्या लक्षणांमुळे कोरोना बहुरूपी आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
कोरोना विषाणू ज्या प्रकारे उत्परिवर्तीत (म्युटेंट) होऊन नव्या रूपात समोर येत आहे, त्याच प्रकारे त्याची लक्षणेही बदलत आहेत. सर्दी, पडसे, ताप, डोके आणि अंगदुखी या लक्षणांसह आता कोरोनाबाधितांमध्ये नवी लक्षणेही दिसून येत आहेत.
डॉ. अजय बाविस्कर सांगतात की, ” कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहेत. काही रुग्णांकडून अतिसार आणि रात्री घाम फुटणे अशा तक्रारीही येत आहेत. त्यामुळे तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल किंवा रात्री घाम फुटल्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोरोनाची चाचणी करून घ्या.”
प्रत्येक वेळी लक्षणांमध्ये वाढ
पहिली लाट – कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोनाबाधितांना सर्दी, पडसे, तापाची लक्षणे आढळत होती. ज्या रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आला, त्यांच्यात अशा प्रकारची लक्षणे होती किंवा त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती.
दुसरी लाट – दुसर्या लाटेत रुग्णांमध्ये सर्दी, पडसे, ताप तसेच डोके आणि अंगदुखीच्या तक्रारी समोर आल्या होत्या. अनेक रुग्णांना तर सर्दी, ताप अशी कोणतीच लक्षणे नव्हती. फक्त अंग आणि डोकेदुखीची तक्रार होती. तेसुद्धा कोरोनाबाधित आढळले होते.
तिसरी लाट – तिसर्या लाटेची सुरुवात झाली आहे. यामध्ये रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे कोणते रूप आहे हेसुद्धा कळायला मार्ग नाही. परंतु रुग्णांमध्ये जुन्या लक्षणांसह अतिसार आणि रात्री घाम फुटण्याच्या तक्रारी आहेत.
पटीत रुग्णवाढ
कोरोनाच्या तिसरी लाट वेगाने फैलावत आहे. कोरोनाच्या नव्या रुपाने बाधित केले तर तो जुन्या रुपापेक्षा पाच पटीने वेगाने फैलावू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, “तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली तर गेल्या लाटेपेक्षा चार पटीने अधिक रुग्ण आढळू शकतात. गेल्या वेळी एका दिवसात १३०० रुग्ण आढळले होते. या वेळी तीच संख्या पाच हजारांच्या वर जाऊ शकते.”
असा करा बचाव
डॉक्टर सांगतात की, “कोविड नियमांचे पालन केले तरच कोरोनापासून आपण वाचू शकतो. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क आवश्य घाला. शारिरीक अंतराचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, घरात आल्यावर पूर्णपणे सॅनिटायझेशन करून घ्या, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांपासून दूर राहा.”