लंडन – जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूपासून जगाची पाठ सुटत नाही तोच प्राणघातक नव्या विषाणूने एण्ट्री केली आहे. या प्राणघातक विषाणूचे नाव आहे नोरोव्हायरस. गेल्या पाच आठवड्यात या विषाणूची सुमारे १५४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. चिंतेची बाब म्हणजे तो अतिशय प्राणघातक आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना संसर्ग कमी झाल्याने लॉकडाऊन उठविण्यात आले आहे. त्यामुळे स्थिती पूर्ववत होत असल्याची सर्वत्र अपेक्षा असतानाच नोरोव्हायरसने शिरकाव केला आहे. ब्रिटनची आरोग्य एजन्सीने असलेल्या पब्लिक हेल्थ ऑफ इंग्लंड यांनी सतर्कता जारी केली आहे. गेल्या काही दिवसांत नोरोव्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. लहान मुले असलेल्या नर्सरी आणि बाल देखभाल केंद्रातही हा विषाणू आढळून येत आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) असे नमूद केले आहे की, कोरोना विषाणूपेक्षा नोरोव्हायरस जास्त धोकादायक असून त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. या विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणालाही उलट्या आणि अतिसार सारखी लक्षणे दिसत आहेत.
धोकादायक
सीडीसीने म्हटले आहे की, नोरोव्हायरसमध्ये कित्येक अब्ज विषाणू आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधून, संक्रमित अन्न खाल्ले किंवा विषाणूमुळे प्रभावित एखाद्या पृष्ठभागाला स्पर्श केला किंवा हात न धुता तोंडावर ठेवले, तर त्याला या विषाणूचा संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो. इतर विषाणूंप्रमाणेच हा विषाणू शरीरात प्रवेश करत रुग्णाला संक्रमित करतो.
नोरोव्हायरस म्हणजे काय?
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) नुसार नोरोव्हायरस हा अति संक्रामक विषाणू असून त्यामुळे उलट्या आणि अतिसार होतो. नोरोव्हायरस आजाराने संक्रमित व्यक्ती कोट्यवधी विषाणू हवेत टाकू शकतात. त्यामुळे संसर्गाचा फैलाव अधिक होऊ शकतो.
लक्षणे अशी
– अतिसार, उलट्या होणे, चक्कर येणे आणि पोटात तीव्र वेदना होणे ही सर्वात महत्वाची लक्षणे आहेत.
– बर्याच रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीरावर वेदना देखील दिसून आली आहे.
– विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर १२ ते ४८ तासांच्या आत हा संसर्ग पसरतो.
– विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला २ ते ३ आठवड्यांपर्यंत उलट्या होतात
कसे रक्षण करावे
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, बाहेरून आल्यानंतर आणि काहीही खाण्यापूर्वी काहीही स्पर्श केल्यावर नेहमीच आपले हात व्यवस्थित धुणे महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त कोविड -१९ टाळण्यासाठी लोक ज्या प्रकारे सेनिटायझर्स वापरत आहेत, त्याच प्रकारे त्यासाठी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरणे योग्य ठरणार आहे.