नवी दिल्ली – दसरा-दिवाळीच्या उत्सव काळात कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच सर्व राज्य सरकारांनी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करुन त्यांचे पालन करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात ऑनलाइन शॉपिंग आणि प्रवास तूर्तास पुढे ढकलण्यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. उत्सवाच्या काळात कोरोना महामारी पसरू नये याची काळजी घेण्यासाठी नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. उत्सवकाळात ऑनलाइन खरेदी पद्धतीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच अनावश्यक प्रवास थांबवण्यास सांगितले आहे.
मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की, देशातील सर्वच नागरिकांनी कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. याशिवाय कॅन्टोन्मेंट झोनमध्ये गर्दी जमू देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत, तेथे गर्दी होऊ देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीला फक्त एका विशेष प्रसंगी जमू दिले पाहिजे. यासोबतच गर्दी जमा करण्यासाठी आगाऊ परवानगी घेणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. गर्दीतील लोकांची संख्या देखील निश्चित करण्यास सांगितले आहे.
मॉल्स, स्थानिक बाजारपेठा आणि प्रार्थनास्थळांबाबत आधीच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोविड व्यवस्थापनासाठी सुचवलेल्या पाच गोष्टींचे पालन (अनुसरण) करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला आहे, विशेष म्हणजे यात कोविड चाचणी, फॉलोअप (मागोवा), उपचार, लसीकरण आणि नियमानुसार वर्तन याचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पुढील महिन्यात दिवाळी आणि ईद साजरी होणार आहे. या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर, कोरोना बाधितांमध्ये वाढ होऊ नये म्हणून सरकारने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. रशिया, युके आणि चीन सारख्या देशांमध्ये कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे.
नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात कोरोनासंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या सूचनांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण जेव्हा बाधितांचे प्रमाण वाढेल तेव्हा त्याचे पालन करता येईल. सर्व राज्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.