विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर दिला जात आहे. त्यानुसारच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी अधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. गेल्या आठवड्यात ज्या जिल्ह्यात संसर्गाचा दर १० टक्के आणि रुग्णालयांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक बेड भरलेले असतील, अशा जिल्ह्यांची नोंद करावी अशा सूचनाही केंद्राने केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लॉकडाउन लावण्याबाबत काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. या मार्गदर्शक सूचना मे महिन्यासाठी असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक बेड अधिग्रहित झालेले आहेत, अशा जिल्ह्यांची ओळख पटविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलेल्या क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यासारखे उपाय योजावेत. संसर्ग दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या क्षेत्रांमध्ये छोटे छोटे प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यावर भर द्यावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
स्थानिक आणि सामुहिक प्रतिबंधित क्षेत्रे लागू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्याही सूचना संलग्न करण्यात आल्या आहेत. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे ३१ मे पर्यंत काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारने म्हटले आहे.