विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत पहिल्यांदाच मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत मंगळवारी संपूर्ण देशात बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदविण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर संसर्गाच्या दरातही घट झाल्याचे दिसत आहे. सर्वाधिक प्रभावित राज्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्येही रुग्णसंख्येत घट होत आहे. पण पंजाब, ओदिशा, बंगाल, केरळ आणि कर्नाटकसारख्या दीड डझनहून अधिक राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ३,२९,९९२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,५६,०८२ इतकी होती. अशा प्रकारे सक्रिय रुग्णांची संख्या दोन महिन्यांनतर पहिल्यांदाच कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
सात मे रोजी सर्वाधिक ४,१४,१८८ नवे रुग्ण आढळले होते. त्यांनतर मात्र रुग्णसंख्येत सलग घट पाहायला मिळाली. ८ मेस ४,०१,०७८, ९ मेस ४,०३,७३८ आणि १० मेस ३,६६,१६१ नवे रुग्ण आढळले.
कोरोनामुळे दररोज होणार्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. नऊ मेस ४,०९२ च्या तुलनेत १० मेस ३,७५४ आणि ११ मेस ३,८७६ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्णसंख्येत वाढ होणे थांबले आहे किंवा घट होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे.
सर्वाधिक तरुण बाधित
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, की कोरोनाच्या दुसर्या लाटेत तरुण लोकांना जास्त संसर्ग होत आहे. तरुणांना कामासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. ४० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना संसर्गाचा धोका अधिक आहे. कोरोना विषाणूचे काही स्ट्रेन तरुणांना बाधित करत आहे.