नवी दिल्ली – मनुष्य आणि अन्य प्राण्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे प्राण्यांना शेपटी असते तर मानवाला नसते. परंतु नुकतीच एक आश्चर्यकारक घटना घडली असून एका नवजात बालकाला शेपटी आढळल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत
वैद्यकशास्त्रात अनेक वेळा इतके आश्चर्यचकित करणारे प्रकार समोर येत राहतात, ती पाहून कधी-कधी तज्ज्ञ डॉक्टरांनाही धक्का बसतो. ब्राझीलमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एक मूल शेपूट घेऊन जन्माला आले आहे. एवढेच नाही तर शेपटीचा शेवटचा भाग गोल होता. या प्रकरणात डॉक्टरांनी अत्यंत धाडसाने शस्त्रक्रिया केली आहे.
सदर प्रकार ब्राझीलमधील अल्बर्ट हॉस्पिटलमधून समोर आले आहे. जेव्हा येथे एका मुलाचा जन्म झाला, तेव्हा त्या मुलाची शेपटी बाहेर पडल्याचे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले. मुलाचे पालकही खूप अस्वस्थ दिसत होते, तेव्हा नेमके काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते. बाळाच्या शेपटीची लांबी सुमारे चार इंच असल्याचे डॉक्टरांना आढळले.
दरम्यान, लांब शेपटीने जन्माला आलेले बाळ, पाहून तेथील अन्य तज्ज्ञ डॉक्टरही थक्क झाले. बाळाच्या या शेपटीचे टोक चेंडूसारखे गोलाकार होते, मात्र शेपटीत हाडांचा कोणताही भाग आढळला नाही. अल्ट्रासाऊंड स्कॅननंतर डॉक्टरांनी सांगितले की शेपूट तिच्या मज्जासंस्थेला जोडलेली नाही. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने बाळाच्या नातेवाईकांना सांगितले की ते शस्त्रक्रियेने काढले जाऊ शकते. त्यानंतर ही शेपटी शस्त्रक्रियेने काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून ती शेपटी यशस्वीपणे काढली.
जर्नल ऑफ पेडियाट्रिक सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये बाळाचा जन्म आणि शेपटी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे अतिशय तपशीलवार वर्णन केले आहे. सुमारे ३५ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर या बाळाचा नियमित वेळेपूर्वीच जन्म झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितले की, गर्भाशयात बाळाच्या गर्भामध्ये शेपटी विकसित होते, परंतु नंतर ती सामान्यपणे शरीरात शोषली जाते. तथापि, क्वचित प्रसंगी असे होत नाही आणि शेपूट वाढतच राहते. येथेही असाच प्रकार घडला.








