मुंबई – किन्नरांच्या समस्या सर्वांना समजत असूनही केवळ सामाजिक जाणिवेच्या बाता मारणारा मोठा समाज आहे. त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यादृष्टीने त्यांची साथ देणे हे कार्य प्रत्येकाला जमणारे नाही. पण माय-बापाने तरी आपल्या पाल्यांच्या बाबतीत हिनवणारी वागणूक देऊ नये. दुर्दैवाने बाळाचा जन्म झाल्यावर ते किन्नर असल्याचे लक्षात आल्यामुळे एका माय-बापाने आपल्या पोटच्या गोळ्याला मंदिराबाहेर सोडून दिले.
मुळात तीन महिन्यांपूर्वी जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा घरातील साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. पण ज्या क्षणाला बाळ किन्नर असल्याचे लक्षात आले, त्याच क्षणाला त्यांच्या भुवया उंचावल्या. मायबापांनी बाळाला एका मंदिराच्या बाहेर सोडून दिले आणि त्याच्याशी नातेच तोडले. मात्र आता शहरातील एका महिलेने बाळाला आधार दिला असून ते किन्नर आश्रममध्ये सुरक्षित आहे.
महिमा (काल्पनिक नाव) तीन महिन्यांची आहे. ती कोणत्या गावातील आहे, आई-वडील कोण आहेत, हे कुणालाही माहिती नाही. केवळ औरंगाबादच्या श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाच्या (पैठण रोड) पायऱ्यांवर ती पडलेली होती. काही सेवकांनी एका महागड्या गाडीतून आलेल्या दाम्पत्याने महिमाला पायरीवर सोडून दिले आणि निघून गेले, असे सांगितले आहे. सेवकांनी ईश्वराचा प्रसाद म्हणून महिमाला ठेवून घेतले. पण ती किन्नर असल्याचे कळल्यावर त्यांचीही चिंता वाढली. त्यांनी गुगलवरून किन्नरांना आधार देणाऱ्या संस्था शोधल्या. तर त्यांना बुलंदशहर येथे एकमेव आश्रम असल्याचे कळले.
मंदिर व्यवस्थापनाने आश्रमाच्या संस्थापक संचालक रंजना अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती दिली. रंजना यांनी महिमाला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली. रंजना व तिचे पती गौरव अग्रवाल औरंगाबादला आले आणि महिमाला घेऊन गेले. या दोघांना गोपाल आणि मयंक अशी मुले आहेत. आता महिमाच्या निमित्ताने तिसरे अपत्य त्यांच्या घरात आले आहे.