वाराणसी (उत्तर प्रदेश) – कोरोनाच्या या संकटकाळात येथे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि चिंताजनक घटना घडली आहे. कोरोना नसलेल्या महिलेने कोरोना पॉझिटिव्ह बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळेच ही बाब सध्या देशभरात चर्चिली जात आहे.
एका महिलेला प्रसूतीचा त्रास होत असताना कुटुंबातील सदस्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या महिलेचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. प्रसुतीनंतर तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर जेव्हा बाळाचीही चाचणी घेण्यात आली, तेव्हा तो अहवाल पॉझेटिव्ह आला. त्यामुळे सर्व जण चितेंत आहेत. कोरोना काळात देशात प्रथमच असे घडले आहे.
वाराणसीच्या बीएचयू हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागात मूळची चांदौली येथील २६ वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी प्रसुतीसाठी दाखल केले. येथे तिचा आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुना घेण्यात आला. आयएमएस बीएचयूच्या एमआरयू प्रयोगशाळेत तपासणीनंतर तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह झाला. त्यानंतर दुपारी १ वाजता या महिलेने मुलीला जन्म दिला. नियमांनुसार, बाळाच्या नमुन्यांची तपासणी केल्यास अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना काळात देशातील असे प्रथमच घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता बाळ आईबरोबर असून उत्तम प्रकारे निरोगी आहे. डॉ. प्रजापती यांनी सांगितले की, महिलेला कधीही कोरोना संसर्ग झालेला नाही आणि तिच्या कुटुंबात कोणालाही कोरोना झालेला नाही. बाळाचा अहवाल पॉझेटिव्ह आल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. मात्र, बाळाची प्रकृती उत्तम आहे. घाबरण्यासारखे काहीच नाही.