अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर परीसर विकासाच्या प्रकल्पाचे काम पुन्हा नव्याने सुरू करावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने हे तीर्थस्थान अध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
नेवासा येथे अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी पदाधिकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर परिसर विकासाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सध्या या परीसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती महसूलमंत्र्यांना दिली.
महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यापूर्वी पालकमंत्री असताना निधीची उपलब्धता करुन दिली होती याची आठवण करून देत स्व.ना.स.फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या काळात कामाची सुरूवात झाली होती.या समितीचे कामही थांबले असल्याकडे लक्ष वेधत विखे म्हणाले की, स्थानिक पदाधिकारी आणि यामध्ये झोकून देवून काम करणाऱ्या व्यक्तीनी पुढाकार घेवून या परीसर विकासासाठी काम सुरू करण्याची गरज असल्याचे सूचित केले.
पंढरपूर विकास आराखड्याचे उदाहरण देवून श्री.विखे पाटील म्हणाले की, नेवासा येथेही मंदीर परीसराचा विकासासाठी नव्या संकल्पना कार्यान्वित करता येतील.यासाठी कृती आराखडा बनविण्यासाठी एखादी एजन्सी नेमावी लागेल.याबाबतही प्रशासनाने विचार करावा.मंदीर वास्तू,भक्त निवास,प्रसादालय,अध्यासन केंद्र,भोवताली असलेल्या मोकळ्या जागा विकसित झाल्या तर एक चांगले अध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून नेवासा तिर्थक्षेत्राचा नावलौकिक वाढविण्यास मदत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काशी विश्वेश्वर तसेच उज्जैन येथील श्रीक्षेत्र महाकालेश्वर मंदीर परीसरात निर्माण झालेल्या काॅरीडाॅरच्या धर्तीवरच संत ज्ञानेश्वर आणि शनिशिंगणापूर मंदीर परीसरात काही विकसित करता येईल का याबाबत निश्चितपणे विचार करू,केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने निधीची उपलब्धता करून मंदीर परिसर विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यासाठी लवकरच बैठक बोलावावी. अशा सूचना महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Nevasa and Shani Shingnapur Development