पुणे – व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने भारतातील डिजिटल सामग्रीची वाढती स्पर्धा आणि मागणी लक्षात घेऊन आपल्या सदस्यता योजनांच्या किंमती कमी केल्या आहेत. आता यूजर्स नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन 150 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतील.
1) नेटफ्लिक्सने 2016 मध्ये भारतात आपली सेवा सुरू केली होती. आता नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लॅनची किंमत 199 रुपयांवरून 149 रुपये करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स मोबाईल आणि टॅबलेटवर वापरता येईल. याचे रिझोल्यूशन 480 पिक्सेल आहे.
2) नेटफ्लिक्सच्या 499 रुपयांच्या मासिक प्लॅनसाठी 300 रुपयांची कमाल किंमत कपात करण्यात आली आहे. आता हा प्लॅन 199 रुपयांचा असेल. या प्लॅनचे रिझोल्यूशन 480 पिक्सेल आहे. ही योजना फोन, टॅब्लेट, संगणक आणि टीव्हीसाठी आहे.
3) नेटफ्लिक्सचा 699 रुपयांचा प्लॅन 499 रुपयांना येईल. त्याचे रिझोल्यूशन 1080 पिक्सेल असेल. ही योजना फोन, टॅब्लेट, संगणक आणि टीव्हीसाठी आहे.
4) नेटफ्लिक्सचा प्रीमियम प्लॅन 799 रुपयांऐवजी 649 रुपये प्रति महिना झाला आहे. हा प्लॅन 4K रिझोल्यूशन सपोर्टसह देण्यात येतो. या प्लॅनसह, नेटफ्लिक्स एकाच वेळी चार उपकरणांवर प्ले केले जाऊ शकते. हे एकाच वेळी मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि टीव्हीला सपोर्ट करेल.
नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकारी मोनिका शेरगिल म्हणाल्या की, नेटफ्लिक्स योजनांची उच्च किंमत ही देशातील सेवा वाढीसाठी प्रमुख अडथळे ठरली होती, विशेषत: डिस्ने प्लस हॉट स्टार, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी आणि सोनी लिव्ह सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करताना हे लक्षात आले. त्यामुळे अधिकाधिक युजर्सना त्यांच्याशी जोडण्यासाठी कंपनीने प्लॅनची किंमत कमी करण्याचे पाऊल उचलले आहे.