इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतासाठीही पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्यात आल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. त्याची सुरुवात आजपासून म्हणजेच २० जुलैपासून झाली आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये असा निर्णय घेतला आहे.
सततच्या तोट्यात कंपनी पासवर्ड शेअरिंग बंद करत आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर समान Netflix खाते वापरत असल्यास किंवा ते मित्रांसोबत शेअर करत असल्यास, तुम्हाला एक ईमेल मिळेल. एकच खाते अनेक लोक वापरत असल्यास, दर सात दिवसांनी कोडद्वारे पडताळणी केली जाईल. याशिवाय, प्राथमिक खात्याचे वाय-फाय नेटवर्क ३१ दिवसांतून एकदा तरी कनेक्ट करावे लागेल.
सोप्या भाषेत सांगायचे तर, नेटफ्लिक्सला त्याचे एक खाते एकाच घरातील अनेक लोकांनी वापरावे. मात्र, अगदी मित्र किंवा नातेवाईकांनी नाही. त्याची पडताळणी कंपनीकडून IP अॅड्रेस, डिव्हाइस आयडी, नेटवर्क इत्यादीद्वारे केली जाईल.
नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे भारतात खळबळ माजणार हे नक्की. पण जे याशिवाय राहू शकत नाहीत त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत कंपनीचे सक्रिय सदस्य वाढतील आणि महसूलही वाढेल. भारतात Netflix प्लॅनची सुरुवातीची किंमत १४९ रुपये आहे. टॉप प्लॅनची किंमत ६४९ रुपये आहे.