इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. नेपाळला पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी हे सर्वांत मोठे आकर्षण असते. पाचव्या शतकात याचे बांधकाम झाल्यामुळे जागतिक वारसा स्थळात याचा समावेश आहे. पण एका विशिष्ट कारणाने हे मंदिर सध्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा ताबा सध्या येथील भ्रष्टाचारविरोधी संस्थेने घेतला आहे. कारण या मंदिरातून १० किलो सोने चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. सध्या मंदिर दर्शनासाठी बंद ठेवून विविध अंगाने तपास केला जात आहे. मंदिर व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या चौकश्या सुरू आहेत. पशुपतीनाथ मंदिर हे काही दिवस बंद राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काठमांडूमधील हे सर्वांत जुने हिंदू मंदिर आहे. येथील दहा किलो सोने गायब झाल्याचा विषय खरे तर सर्वांत पहिले संसदेत उपस्थित झाला होता. त्यानंतर सरकारने यासंदर्भात तपास करण्यासाठी सीआयएए या आयोगाला आदेश दिले. ही संस्था अधिकारांच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणांचा तपास करते. तसेच नेपाळमध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.
जलहरीसाठी खरेदी
पशुपती क्षेत्र विकास प्राधिकरणाने जलहरी तयार करण्यासाठी १०३ किलो सोने खरेदी केल्याचे सांगितले आहे. पण यातून १० किलो सोने गायब झाले. सोने हरवल्याची शंका निर्माण झाल्यामुळे जलहरीचा दर्जा आणि वजन निश्चित करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
लष्करही दाखल
भ्रष्टाचारविरोधी संस्था तपास करीत असताना बाहेर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये नेपाळच्या लष्करालाही मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहे. आणखी एक दिवस मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.