इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने आता भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले आहे. फिनलँडच्या किओर्ताने क्रीडा स्पर्धेत नीरज याने ८६.८९ मीटर भालाफेक करून सुवर्णमुद्रेवर स्वतःचे नाव कोरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नीरजने ही कामगिरी केली आहे.
२०१२ लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता त्रिनिदादच्या केशॉर्न वालकॉट याचा पराभव करून नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत वालकॉट याने ८६.६४ मीटर अंतरावर भाला फेकला. भारताकडून सहभागी झालेल्या आणखी एक अॅथलिट संदीप चौधरी याने ६०.३५ मीटर अंतरावर भाला फेकला. परंतु त्याला पदकाने हुलकावणी दिली आणि त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
नीरजने पहिल्या प्रयत्नात ८६.६९ मीटर भाला फेकला. त्यानंतरच्या प्रयत्नात तो घसरला, त्यामुळे त्याचा भालाफेक अमान्य ठरविण्यात आला. याच भालाफेकीच्या जोरावर नीरजने सुवर्णपदक मिळविले. परंतु नीरजने याच महिन्यात पावो नुरमी क्रीडा स्पर्धेत ८९.३० मीटर अंतरावर भाला फेकला होता आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. विशेष म्हणजे हा विक्रम केल्यानंतरही नीरजला रजत पदकावर समाधान मानावे लागले होते.
या स्पर्धेत पावसामुळे मैदानावर पाणी जमा झाले. परिणामी भालाफेकीसाठी खूप प्रयत्न करावे लागले. मैदानावरील चिखलामुळे भालाफेक करणे नक्कीच सोपे नव्हते. पण तरीही या प्रतिकूल परिस्थितीत नीरजने सुवर्णवेध घेतला. भालाफेकीचा तिसरा प्रयत्न करताना नीरजचा पाय घसरला आणि तो रेषेच्या बाहेर गेला. नियमांनुसार त्याचा हा भालाफेक अवैध ठरविण्यात आला. घसरल्यामुळे नीरजला कोणतीही दुखापत झाली नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली.