मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जपानी मासिक ‘मॅडम फिगारो’ ने मुंबईच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ला (NMACC) जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक केंद्रांच्या यादीत स्थान दिले आहे. ही पहिलीच वेळ आहे की भारतातील एखाद्या सांस्कृतिक केंद्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. देशातील सर्वात मोठ्या कला केंद्रांपैकी एक, या केंद्राला भारतीय संस्कृतीनुसार कमळाच्या आकारात डिझाइन करण्यात आले आहे. NMACC मुंबई शहराच्या बांद्रा कुर्ला परिसरात स्थित आहे.
मॅडम फिगारो मासिकात लिहिले आहे की, “जगातील सर्वोत्तम कला भारतात आणणे आणि भारतातील सर्वोत्तम कला जगभर पोहोचवणे या दृष्टिकोनातून, NMACC ची स्थापना नीता मुकेश अंबानी यांनी 2023 मध्ये केली होती. इथले विविध थिएटर आणि आर्टहाउसमध्ये, भारतीय कलाकारांच्या प्रदर्शनांपासून शास्त्रीय गायन-वादन-नृत्य, ब्रॉडवे संगीत आणि नाट्यप्रयोगांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची एक विस्तृत श्रेणी सादर केली जाते. हे कला केंद्र भारताच्या कला क्षेत्रात बदल घडवत आहे.”
NMACC शिवाय या यादीत न्यूयॉर्कचे रिचर्ड गिल्डर सेंटर, लॉस एंजेलिसचे इंट्यूट डोम, एम्स्टर्डमची डेड एंड गॅलरी, हाँगकाँगचे सोथबायस मैसन, बँकॉकमधील बँकॉक आर्ट बिएननेल आणि बर्लिनचे डार्क मॅटर यांचा समावेश आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या बांद्रा कुर्ला येथे स्थित नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) हे भारतीय कला क्षेत्रातील आपल्याच प्रकारचे पहिले सांस्कृतिक केंद्र आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे केंद्र भारताची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे.