मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले आहे. भारत सरकारच्या ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ या अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपक्रमात महाराष्ट्र राज्यासाठी पाच समर्पित पीएम-ई-विद्या वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पीएम-ई-विद्या 113 (SCERTM C 113) इयत्ता १ वी व ६ वी, पीएम-ई-विद्या 114 (SCERTM C114) – इयत्ता २ री व ७ वी, पीएम-ई-विद्या 115 (SCERTM C115) इयत्ता ३ री व ८ वी, पीएम-ई-विद्या 116 (SCERTM C116) – इयत्ता ४ थी व ९ वी आणि पीएम-ई-विद्या 117 (SCERTM C117) इयत्ता ५ वी व १० वी या वाहिन्यांवर त्यासमोर दिलेल्या इयत्तांसाठी दर्जेदार शैक्षणिक आशयाचे प्रक्षेपण केले जात आहे. या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूब वर थेट (लाईव्ह) उपलब्ध असून प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते. हे कार्यक्रम २४ तासांत तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होते.
या उपक्रमासाठी राज्यस्तरावर तसेच वाहिनीनिहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. समन्वयक मंडळ प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे, वेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रमांची शाळा व पालकांपर्यंत प्रभावी पोहोच घडवून आणणे या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रामार्फत सर्व शिक्षक, अधिकारी तसेच पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, या सर्व शैक्षणिक वाहिन्या यूट्यूब वर सब्स्क्राइब कराव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळेल. या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maa.ac.in) पीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅब अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीएम-ई-विद्या वाहिन्यांचा उपयोग करण्यासाठी http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev या लिंकचा देखील उपयोग करता येईल.
पीएम-ई-विद्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे सामर्थ्य अनुभवायला मिळत आहे. हे पाऊल ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करून प्रत्येक मुलापर्यंत ज्ञान पोहोचवत आहे. या वाहिन्यांद्वारे अभ्यासक्रमाशी थेट निगडित तसेच मुख्य प्रवाहातील सर्व शालेय विषयांसाठी दर्जेदार व्हिडिओ सामग्री उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला गती मिळत आहे. शिक्षकांसाठीही हे एक प्रभावी शैक्षणिक साधन ठरत असून, शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यास मदत होत आहे.
पीएम-ई-विद्या हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्न भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एक क्रांतिकारी प्रयत्न असून, परिषदेमार्फत सर्वांना या वाहिन्या सब्स्क्राइब करण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.