विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर हा विषाणू रूप बदलून संक्रमित करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा विषाणू वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या रूपात आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने त्या विषाणूंना अल्फा, बिटा, ग्यामा आणि डेल्टा अशी नावेसुद्धा दिली आहेत. परंतु हा विषाणू आणखी वेगळ्या रूपात आपल्यासमोर येत असून त्यांचे हे रुप घातक असल्याचेही निदर्शनास येत आहे.
कोरोनाची ही वेगवेगळे रूपे पाहिल्यानंतर भारतात आता आणखी नवा कोरोना अवतार (व्हेरिएंट) आल्याचा खुलासा झाला आहे. या विषाणूमुळे सात दिवसात रुग्णांचे वजन कमी होते. विषाणूचा हा अवतार ब्राझिलमध्ये सर्वात प्रथम आढळला होता. परंतु तेथून एकच अवतार भारतात आल्याचा दुजोरा मिळाला होता. परंतु ब्राझीलमधून एक नव्हे तर दोन अवतार भारतात आल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. दुसरा अवतार बी.१.१.२८.२ खूपच वेगाने पसरणारा आणि धोकादायक आहे.
सिरियाई हॅमस्टर (एका प्रजातीचा उंदिर) च्या परीक्षणात असे आढळले की, संक्रमित झाल्यानंतर सात दिवसांत या अवताराची ओळख पटू शकते. हा अवतार शरीराचे वजन वेगाने घटवू शकतो. डेल्टा विषाणूप्रमाणेच हा अधिक गंभीर आणि अँटिबाॉडी क्षमता कमी करू शकतो.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) संशोधक डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, बी.१.१.२८.२ व्हेरिएंट बाहेरून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळला होता. त्याचा किती परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर परीक्षणसुद्धा करण्यात आले. आतापर्यंत भारतात या अवताराचे जास्त रुग्ण आढळले नाहीत. डेल्टा व्हेरिएंट अधिक प्रमाणात आढळत आहे. या विषाणूमुळे अँटिबॉडीची क्षमता कमी करत असल्याने दुसऱ्यांना संसर्गाचा धोका संभावतो. त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
नऊपैकी तिघांचा मृत्यू
परदेशातून प्रवास करून आलेल्या ६९ आणि २६ वर्षीय प्रवाशांच्या नमुन्यांची सिक्वेन्सिंग करण्यात आली. बरे होईपर्यंत या दोन्ही रुग्णांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. परंतु त्यांच्या नमुन्यांचे सिक्वेन्सिंग केल्यानंतर बी.१.१.२८.२ व्हेरिएंट आढळला. त्याचे नऊ सिरियाई हॅमस्टरवर सात दिवस परीक्षण केल्यानंतर त्यापैकी तीन जणांचा मृत्यू शरीरातील आंतरिक भागात संसर्ग झाल्याने झाला. या दरम्यान फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्यासह शरीरातील अँटिबॉडी कमी झाल्याचीही माहिती मिळाली.
वेगळे परिणाम
ज्या दोन लोकांमध्ये हा अवतार आढळला, तेव्हा त्यांना काहीच लक्षणे नव्हती. परंतु जेव्हा या अवतारने सिरियाई हॅमस्टरना संक्रमित करण्यात आले तेव्हा त्याच्या गंभीरतेबाबत माहिती मिळाली. संशोधकांच्या माहितीनुसार, कोरोनाचे बहुतांश परीक्षण सिरियाई हॅमस्टरवर होत आहेत. त्यामुळे बी.१.१२८.२ व्हेरिएंटने बाधित रुग्ण वाढल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.