अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. या कारवाईत सर्व नागरिकांची सुरक्षिततेने सुटका करण्यात आली.
स्थानिक प्रशासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), भारतीय हवामान विभाग (IMD) व धरण प्राधिकरणाशी समन्वय साधून NDRF पुणे पथक सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी पुणे तुकडी सदैव सज्ज असल्याचे एनडीआरएफ कडून कळविण्यात आले आहे.