नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी पेठ तालुक्यातील ३२ जप्त केलेले ट्रॅक्टरांचा लिलाव जाहीर केला होता. त्यापैकी १० थकबाकीदार सभासदांनी भरणा केल्याने ट्रॅक्टर सभासदास देण्यात आले. तर उर्वरीत २२ ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला.
या लिलाव प्रक्रियेबाबत बँकेने माहिती देतांना सांगितले की, जिल्हा बँकेची वाहन / ट्रॅक्टर कर्जाची मोठी थकबाकी झालेली असून पेठ तालुक्यातील ३२ ट्रॅक्टर / वाहन जप्त केलेले होते. त्याप्रमाणे ट्रॅक्टर / वाहनाची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त करून १६ एप्रिल रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. सदर लिलावा विरुद्ध थकबाकीदार सभासद हे उच्च न्यायालयात गेले असता त्यांना तात्पुरती स्थगीत न्यायालायाने दिली होती. न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनावनीमध्ये बँकेने दिलेले कर्ज हे सदर मालमत्ते करीता दिलेले असून सदर कर्जदाराचे कर्ज वसुल न झाल्याने दिवसेंदिवस व्याज वाढत असल्याने व बँकेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या ट्रॅक्टर / वाहनाची दिलेली स्थगिती उठविण्यात यावी अशी विनती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी दिलेली स्थगिती उठवली.
२२ ट्रॅक्टरची लिलाव प्रक्रिया
सदर जप्त केलेल्या ट्रॅक्टर / वाहनाची लिलाव करण्यास ३० मार्च २०२३ च्या आदेशान्वये परवानगी दिलेली असून सदर ३२ ट्रॅक्टर / वाहनाचा लिलावाची जाहीर नोटीस १० एप्रिल रोजी प्रसिद्ध करून १७ एप्रिल रोजी बँकेच्या व्दारका येथील प्रधान कार्यालय येथे ठेवण्यात आला होता. ३२ जप्त केलेले ट्रॅक्टरांचा लिलाव संपन्न झालेला आहे. त्यापैकी आज रोजी १० थकबाकीदारांनी सभासदांनी भरणा केल्याने ट्रॅक्टर सभासदास देण्यात आले. उर्वरीत २२ ट्रॅक्टरची लिलावप्रक्रिया पार पडली आहे. सदर लिलावा प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, व्यवस्थापक अरुण थेटे, राजेंद्र भामरे, प्रदीप (रमेश ) शेवाळे, रवींद्र पगार, विका संस्थेचे सचिव यांनी लिलाव प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य केले आहे.
बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन
जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस व्याज सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.