नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीन कोटीच्या सानुग्रह अनुदानाच्या संशयास्पद वाटप झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मनसे सहकार सेनेने विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांना तक्रार केली आहे.
मनसे सहकार सेनेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेतकर्यांसाठी कार्यरत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक बँकेच्या संदर्भात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे चे कामकाज करीत असलेल्या सचिवांचा सानुग्रह अनुदान वाटपाचा विषय आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सेवा पुरविण्याचे काम काज करते. स्थानिक ग्रामीण पातळीवर विविध कार्यकारी संस्था या शेतकऱ्यांसाठी विविध सेवा देण्याचे काम करताना दिसते. त्या संस्थेचे कामकाज सचिव पहात असतात. त्यांना प्रोत्साहनपर बोनस अथवा सानुग्रह देणे योग्य आहे. परंतु सदरची रक्कम त्यांना प्रत्यक्ष मिळालीच नाही. यात फार मोठा गैरव्यवहार झाल्याचे आढळते. यातील संपूर्ण प्रक्रिया ही खूपच संशय निर्माण करणारी आहे. संपूर्ण प्रक्रिया राबविणारे सहकार खात्यातील अधिकारी आहेत. सानुग्रह अनुदान देणे बाबतची प्रक्रिया एकाच कार्यालयाद्वारे राबविलेली असेल असे नाही. यात सहकारातील वरिष्ठ अधिकारी व विविध कार्यकारी लेखा संस्थेचे सचिव व बँकेचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, सेनेने पुढे म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकेकडे पैसे नसताना एकाच दिवशी सचिवांना सानुग्रह अनुदानापोटी एवढ्या मोठ्या रकमेचे वाटप कसे काय झाले? सदरची बाब अतिशय गंभीर असून याची सखोल रित्या चौकशी होणे आवश्यक आहे. ज्या बँकेवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कार्यवाही झाली. त्यात संचालक मंडळ बरखास्त झाले, सतत बँकेच्या पदाधिकाऱ्यावर कार्यवाहीची टांगती तलवार असताना पुन्हा याच पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करणे कितपत योग्य आहे? अशा अधिकारी व पदाधिकारी यांची चौकशी होऊन त्यांना कठोर शासन व्हावे. शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर झाला आहे आपण शेतकऱ्यांसाठी तरी अशा अधिकारी, बँकेचे पदाधिकारी व संस्थेचे सचिव यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी. काहीच कार्यवाही दिसून न आल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे शहराध्यक्ष विशाल साळवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी गौरव शिंपी, हेमंत फापाळे, रवी तांदळे, सुरज खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.